ह्या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याच जागेवर येशू ख्रिस्ताने दोन माशे व पाच भाकरीचा चमत्कार करून पाच हजार लोकांना भोजन दिलेले.
आज त्या जागेवर उभ्या असलेल्या देवळाला व त्या देवळाच्या वेदीखाली असलेला तो पुरातन दगड ज्या दगडावर येशू ख्रिस्ताने दोन मासे व पाच भाकरी असलेली टोपली ठेवलेली व स्वर्गीय पित्याची प्रार्थना केलेली हे पाहून विश्वासाने आपण आपले पुढचे स्थान म्हणजे त्या जागेवर येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर पेत्राला भेट देऊन ख्रिस्तसभेचे हक्क बहाल केलेले त्या गॅलिलि समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले चर्च ऑफ प्रायमसीला भेट देतो.
जॉर्डन देशातील आपले वास्तव्य उरकून आम्ही वचनदत्त पवित्रभूमीच्या म्हणजेच सध्याच्या इस्राएल
देशाच्या दिशेने प्रवासाला निघालो. खरे पहिले तर ज्या याबूक नदीच्या काठी पनिएल इथे परमेश्वराशी झालेल्या
झुंजी नंतर याकोबाला परमेश्वराने इस्राएल हे नाव बहाल केले ती जागा सध्याच्या जॉर्डन देशात आहे त्यामुळे जॉर्डन
देशाचे रहिवाशी हे देखील स्वतःला पवित्रभूमीचा भाग मानतात. तसे पाहिले तर जॉर्डन देशवासीय हे मूळचे,
इसहाकाचा ज्येष्ठ पुत्र एसाव ज्याला आपल्या तांबूस वर्णामुळे अदोम हे नाव प्राप्त झाले त्याचे वंशज. पुढे ह्या देशाचा
काही भाग परमेश्वराने अब्राहामाचा पुतण्या लोट, ह्याचे पुत्र मवाब, व बेनम्मोनी ह्यांना व त्यांच्या वंशाला वतन
म्हणून दिलेला. त्यामुळे ह्या भागात राहणारे लोक हे मूळचे अदोमी, मवाबी व अम्मोनी वंशीय.
साधारण तास ते दीड तासाच्या प्रवासानंतर आपण शेख हुसेन ब्रिज किंवा जनरल ऍलन बी क्रॉसिंग जवळ
पोहोचतो. जॉर्डन मध्ये विमानतळावर उतरताना किंवा जॉर्डन देशात वास्तव्याला असताना जाणवणारा शुष्कपणा
किंवा कोरडेपणाच्या विपरीत ह्या जागेवर आपल्याला हिरवळीची जाणीव व्हायला सुरुवात होते. ह्या सरहद्दीवर
आपण पोहोचलो कि जाणीव होते ती काटेकोर सुरक्षा आणि शिस्त ह्याची. इथे आपली जॉर्डन देशातील बस
आपल्याला ह्या चेक पोस्ट म्हणजेच सुरक्षा द्वाराच्या एकदम लगत आपल्या सामानासहित सुरक्षित उतरवून आपल्या
देशात माघारी फिरते. खरे पाहिले तर एका दारातून घुसून दुसऱ्या दारातून बाहेर पडायचे असते. पण आत
शिरल्यावर उमजते कि इस्राएल प्रवेश म्हणजे उंटाने सुईच्या नाकातून जाण्याइतकेच जड आहे. दरवाजातून आत
शिरल्यावर हिब्रू मिश्रित इंग्रजीत दिल्या जाणाऱ्या कडक सूचना कानावर पडतात. आवाज आणि सूचना कणखर
असल्या तरी देणारे चेहरे पाहिले कि, आश्चर्य वाटते कि, लालबुंद चेहऱ्याची व भुऱ्या केसाची जी मुलं कॉलेज विश्वात
असावीत ती ह्या सरहद्दीवर काय करतात. पण आपला देश हा देवाने आपल्या पूर्वजांना अन आपल्याला वतन
म्हणून दिलेला आहे आणि आपण त्या देशाची वेळ प्रसंगी प्राण देऊन देखील सुरक्षा केली पाहिजे ह्या ध्येयाने हि
जवान पोरं इथे तैनात असतात. साधारण तासाभरात इथला सोपस्कार पार पडतो. पण एका दरवाजातून सहज
शिरलेले आपण जेव्हा दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडतो तेव्हा एका अग्निदिव्यातून पार पडल्या सारखी भावना
आपल्या मनात असते. इथे नमूद करण्यासारखा एक प्रसंग मला आज आठवतो. माझ्या एका अशाच पवित्रभूमीच्या
वारीस जाणाऱ्या प्रवासात दोन इसम आपल्या कुटुंबासहित सामील होते. ते मला भेटल्या दिवसापासून तर ह्या
सुरक्षा चौकीच्या दारातून बाह्रेर पडेपर्यंत त्याचा दृष्टीकोन हा आम्ही पैसे भरले आहेत, आम्हाला काही माहित नाही ,
आता पुढची जबाबदारी तुमची असा होता. पण इस्राएलच्या सुरक्षा चौकीतून बाह्रेर पडताक्षणी ते दोन्ही इसम
माझ्याजवळ येऊन मला बाजूला घेत व माझा हात आपल्या हातात घेत म्हणाले,” हे अग्निदिव्य तुम्हीच पार पाडू
शकता.” त्या वेळेपासून तर पूर्ण सहल संपेपर्यंत त्या दोघं इसमांनी मला केलेले सहकार्य पाहून माझी खात्री पटली कि,
पवित्रभूमीचा अनुभव माणसात बदल घडवून आणतो. .
सुरक्षा चौकीच्या पलीकडच्या दरवाजात आपला इस्राएल सहल मार्गदर्शक आपली वाट पाहत असतो.
परदेशातून आलेल्या आपल्या स्नेह्यांना भेटावे इतक्या आत्मीयतेने आपलं स्वागत झाले कि आपल्याला पुढचे काही
दिवस वाहनात फिरायचे असते, त्या वाहनात बसून आपण, आपला खरा इस्राएल प्रवास सुरु करतो. इथे फिरत
असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे इस्रायल – जॉर्डन देशातील फरक. जॉर्डन मध्ये दिसणारी करड्या
रंगाची घरे, शुष्क वातावरण , पाण्याची वानवा, उजाड कोरड्या टेकड्या तर इस्राएल मध्ये आदळते रंगबेरंगी घरे,
गोड्या पाण्याचे भव्य गॅलिली सरोवर, डोंगर उतारावर लावलेले आंब्याची ,ऑलिव्हची झाडे. अन आपसुक मन
विश्वास बाळगू लागते कि खरोखर, परमेश्वराने अब्राहामाला कबूल केलेला दूध मधाच्या प्रदेशात आपण पोहोचलो
आहोत. साधारणपणे तास – दीडतास प्रवास केल्यानंतर आपण इस्राईलमधील ज्या पहिल्या स्थळाला भेट देतो ते
स्थळ म्हणजे येशू ख्रिस्ताची कर्मभूमी “कफर्णहूम”. गॅलिली सरोवराच्या पाटावर वसलेले हे शहर येशू ख्रिस्ताच्या
जीवनातील एका महत्वाच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करतो. आपण आपल्या पवित्रभूमीच्या वारीला खरी सुरुवात
करतो ती कफर्णहूम गावात उभ्या असलेल्या प्राचीन सिनेगॉग पासून. बायबलच्या नव्या करारात ( मत्तय ८ : ५ –
१३ )
नमूद केल्याप्रमाणे ह्याच जागी येशू ख्रिस्ताने रोमन शताधिपतीच्या चाकराला वाणीने बरे केलेले. पुढे ह्याचा गावात
वसलेल्या पेत्राच्या सासूचे घर ज्या जागी येशू ख्रिस्ताने एका पक्षघाती माणसाला बरे केलेले ( मार्क २ -: १ – १२ )
त्याजागी असलेल्या जुन्या घराला व त्या जागेवर बांधलेल्या देवळाला भेट देऊन थोड्याच अंतरावर दिमाखात उभ्या
असलेल्या संत पेत्राच्या विशाल पुतळ्याचे दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या स्थळ भेटीसाठी रवाना होतो. बस ने
साधारण एक पंधरा मिनिटाच्या प्रवासावर वसलेले तबघा हे ठिकाण आपले पुढचे दर्शन स्थळ. ह्या जागेचे वैशिष्ट्य
म्हणजे ह्याच जागेवर येशू ख्रिस्ताने दोन माशे व पाच भाकरीचा चमत्कार करून पाच हजार लोकांना भोजन दिलेले.
आज त्या जागेवर उभ्या असलेल्या देवळाला व त्या देवळाच्या वेदीखाली असलेला तो पुरातन दगड ज्या दगडावर
येशू ख्रिस्ताने दोन मासे व पाच भाकरी असलेली टोपली ठेवलेली व स्वर्गीय पित्याची प्रार्थना केलेली हे पाहून
विश्वासाने आपण आपले पुढचे स्थान म्हणजे त्या जागेवर येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर पेत्राला भेट देऊन
ख्रिस्तसभेचे हक्क बहाल केलेले त्या गॅलिलि समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले चर्च ऑफ प्रायमसीला भेट देतो. ह्या
जागेवर उभे असताना , ज्या कुणी बायबल मधला योहान अध्याय २१ ओवी १ ते १९ हा दाखल वाचला असेल
त्याला तो प्रसंग जणूकाही आपल्या डोळ्यासमोर घडतोय असे प्रतीत होते. तो धीरगंभीर गॅलिली समुद्राचा किनारा,
आपल्या रब्बीवर जीवापाड प्रेम असणारा पेत्र व इतर शिष्य व आपल्या शिष्यांचा आधारस्तंभ असलेला ख्रिस्त हे
सर्वजण आपल्या पुढ्यात बसले आहेत व आपण त्या प्रसंगाचे जिवंत साक्षीदार आहोत ह्याचा अनुभव येतो. अंग अंग
रोमांचित झालेले आपण सर्वजण मग ह्याच घटनेवर आधारित , गॅलिली समुद्रात सापडणारे व संत पीटर मासा ह्या
नावाने प्रसिद्ध असलेल्या माशाचे भोजन घेण्यासाठी गॅलिली समुद्राच्या विस्तीर्ण तटावर वसलेल्या रेस्टॉरंटमध्ये
प्रवेश करतो जणूकाही येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यासोबत घेतलेले शेवटचे वल्हांडण भोजन घेण्यासाठी.
प्रसन्न वातावरण, मनमोकळी चर्चा व मनोसक्त जेवण असा स्वर्गीय अनुभव घेऊन आपण आपल्या पुढच्या
नियोजित कार्यक्रमासाठी म्हणजेच गॅलिली समुद्रातील बोट सफरीचा अनुभव घेण्यासाठी गेन्नेसेरेत ह्या भागात
पोहचतो. जगातील एकमेव गोड्या पाण्याचा सरोवर ज्याला समुद्र म्हणून संबोधिले जाते अशा गॅलिली समुद्रात
साधारण पंचेचाळीस मिनिटे बोटीची सफर हा येशू ख्रिस्तासमवेत शिष्यांनी केलेल्या अनेक प्रवासापैकी एक
प्रवासाच जणू. असा पूर्ण दिवसाचा बायबल मधल्या प्रसंगाचा अनुभव घेऊन थकलेल्या शरीराने व उद्याच्या
उत्सुकतेने आपण आपल्या हॉटेल निवासासाठी आपल्या नियोजित हॉटेल कडे प्रस्थान करतो.