सर्वप्रथम आपण हवा बदलासाठी जातोय की पर्यटनासाठी, की दोहोंचा मध्य हा आपला उद्देश आहे हे पहिलं तपासून पाहिलं पाहिजे. मग पुढची तयारी करणे सोपे जाते. हवाबदल हा आपला उद्देश असेल तर मग आपण ज्या ठिकाणी जातोय तिथला निवास, सभोवतालचा परिसर, तिथली खानपान संस्कृती, अन वाटलंच तर जवळपास एखादं दुसरे पर्यटन स्थळ ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

प्रवास, पर्यटन की हवाबदल?

सध्याचं मानवी जीवन हे जितकं धावपळीचं आहे तितकेच स्पर्धात्मक आहे. जितकी जास्त स्पर्धा , धावपळ तितकीच जास्त. स्पर्धा मग ती स्वतःशी असो की इतरांशी. पण ज्याप्रमाणे आपण वापरत असलेला भ्रमणध्वनी चोवीस तासांत एकदातरी चार्ज करावा लागतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या शरीराला अन् मनाला काही नियमित वेळाने तरोताजा करणे अगदी गरजेचं आहे. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. कुणी ध्यान करतो, तर कुणी वाचन. कुणी चित्रपट पाहतो तर कुणी समुद्र किनारी जाऊन मन शांत करतो. परंतु सगळ्यात जास्त प्रचलित पद्धत म्हणजे आपण राहत असलेल्या जागेपासून, आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीपासून वेगळ्या जागे – परिस्थितीत जाऊन काही दिवस हिंडणे फिरणे किंवा मग हवाबदल म्हणून चार सहा दिवस निवांत निवास करून येणे. पण सध्या ह्या बाबतीत ही बरीच स्पर्धा किंबहुना चढाओढ दिसून येते. मला काय आवडतं ह्यापेक्षा दुसऱ्यांचे फेसबुक फोटो किंवा व्हॉटसॲप स्टेटस पाहून आपल्या हिंडण्या फिरण्याच्या जागेची निवड केली जाते. एखाद्याला समुडकिनारी आवडतं असेल तर दुसऱ्याला डोंगर पायथ्याशी. एखाद्याला शांत अशी शहरापासून दूर असलेली वस्ती आवडतं असेल तर दुसऱ्याला मॉल थिएटर संस्कृती असलेली शहरी परिस्थिती. व्यक्ती तशी प्रकृती.


मग फेसबुक / व्हॉटसॲप माध्यमांना आपल्या आवडी निवडी ठरवू द्यायच्या की इतरांच्या अनुभवाला हे आपल्याला ठरवावे लागेल. काही लोकं ह्यासाठी यूट्यूब / google ची बऱ्यापैकी मदत घेतात. ही माध्यमे भाकरी भाजणे शिकवू शकतात पण पीठ मळणे व पोळी लाटणे स्वतःलाच करावे लागते. थोडक्यात माध्यमांच्या साहाय्याने निवडलेली जागा अचूक असेल हे मत चुकीचं ठरेल. मग ह्यावर उपाय काय? त्यासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत? कोणती काळजी घेतली पाहिजे? जागेची निवड कशी करावी? एक ना अनेक प्रश्न.

प्रवासमागचा आपला उद्देश काय?

सर्वात पहिली जरुरीची गोष्ट म्हणजे आपला उद्देश्य काय आणि आपल्याला काय आवडतं हे जाणून घेतलं पाहिजे. सर्वप्रथम आपण हवा बदलासाठी जातोय की पर्यटनासाठी, की दोहोंचा मध्य हा आपला उद्देश आहे हे पहिलं तपासून पाहिलं पाहिजे. मग पुढची तयारी करणे सोपे जाते. हवाबदल हा आपला उद्देश असेल तर मग आपण ज्या ठिकाणी जातोय तिथला निवास, सभोवतालचा परिसर, तिथली खानपान संस्कृती, अन वाटलंच तर जवळपास एखादं दुसरे पर्यटन स्थळ ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.
पर्यटन हा आपला प्रमुख उद्देश असेल तर मग ह्या उद्देशाला जोडून येणारा मुद्दा म्हणजे प्रवास. प्रवासाशिवाय पर्यटन शक्यच नाही. पर्यटन म्हणजे प्रवास व निवास पकडुन कमीत कमी आठवड्याभराचा कालावधी आपल्या गाठीशी असणे जरुरी आहे. खरं पाहिलं तर भारत देशाचा विचार केला तर एखादं शहर वा एखादं राज्य आठवड्याभरात पूर्ण पाहून घेणं हे एवढं सहज आणि सोपे नाही. वर्षातून एकदा पर्यटनासाठी जाणाऱ्यांनी जातोय तर तो प्रदेश एकाच फेरीत पूर्ण पाहून घेतल्यास वेळेचा आणि आपण खर्च करत असलेल्या पैशाचा योग्य विनियोग होऊ शकतो. अशावेळी आपलं बजेट थोडेसे लवचिक असेल तर मग पर्यटन स्थळ, निवास, भोजन, वाहन व्यवस्था ह्या गोष्टीची चांगली निवड करायला सोपे जाते. दूरवरच्या प्रवासाला जाताना कमीत कमी दोन ते तीन महिने अगोदर आपल्या पर्यटनाची आखणी केल्यास बरीचशी नसली तरी थोडीफार सवलत मिळवून आपण आपलं पर्यटन सुखकर करू शकतो. दूरच्या प्रवासाला जाताना शक्यतो रेल्वे गाडीने प्रवास टाळल्यास आपला अनुभव खूप कमी दगदगीचा होऊ शकतो. पर्यटना दरम्यानचा प्रवास आपण टाळू शकत नसल्याने, घर ते इप्सित स्थळ व परतीचा प्रवास विमानाने करणे कधीही सोयीस्कर ठरतो. बजेटची ओढाताण असेल तरच रेल्वे प्रवास हा पर्याय निवडावा.

निवासाचा पर्याय निवडताना, आपण रोजच्या जीवनात वापरणाऱ्या सुविधा मिळतील असा पर्याय निवडला तरी पुरेसे, पण पाच दिवसाच्या निवासात एखादा दिवस तरी एखाद्या चांगल्या सुख सुविधा असलेल्या हॉटेलची निवड केल्यास पर्यटनाचा अनुभव आणखी सुखकर आणि अविस्मरणीय ठरतो.

खालील बाबी निश्चितपणे विचारात घेणे गरजेचे आहे.

  1. ज्या प्रदेशात जात आहोत तिथलं वातावरण, हवामान ह्याबद्दल माहिती असणे फार जरुरीचे.
  2. पाच दिवसाचा निवास दोन दोन एक असा विभागला तर पर्यटन नेटकं होते.
  3. न्याहरी व निवास, किंवा, न्याहरी, रात्रीचे जेवण व निवास अशी व्यवस्था निवडावी. दुपारच्या जेवणाची स्वतः निवड केल्यास फार चांगले.
  4. दोन्ही बाजूच्या विमान प्रवास शक्यतो एकच विमान कंपनी मार्फत करावा.
  5. पर्यटन ठिकाणी विमानाने पोहोचण्याची वेळ शक्यतो सकाळी नऊ ते दुपारी बारा ह्या दरम्यान असावी. पुढचा प्रवास लक्षात घेऊन ह्याची आखणी करावी.
  6. घरी परतताना सुद्धा विमान परतीचा प्रवास साधारणपणे सकाळी नऊ ते बारा आणि विमानतळ शेवटच्या निवासस्थानापासून दूर असल्यास दुपारची वेळ निवडावी.
  7. आपली ओळखपत्रे जपून ठेवावीत. Pdf किंवा scan करून मोबाईल मध्ये जतन करून ठेवल्यास अडचणीच्या काळात फार मोलाची मदत होऊ शकते.
  8. प्रवास विमा घेणे कधीही फायदेशीर.