रोहन आणि स्वाती दोघे आपल्या वैवाहिक जीवनाचे तलम स्वप्न वस्त्र विणण्यात मश्गुल होते.  लग्न उरकले की सगळे रितीरिवाज पूर्ण करून मधुचंद्राला निघायचे. कमीतकमी एक आठवडा आपण ठरवलेल्या काही ठिकाणांपैकी एक जागा निवडून मस्तपैकी हिंडायचे, छानपैकी स्थळदर्शन करायचे अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकांत. पण मग प्रश्न उरला कोणते ठिकाण हा निर्णय गुगलच्या मदतीने घ्यायचा की एखाद्या स्थानिक ट्रॅव्हल कंपनीच्या मदतीने. दिसते तसे नसते हे सूत्र वापरून गूगल हा पर्याय बाद करून दोघे एक स्थानिक ट्रॅव्हल कंपनीत पोहोचले. जुजबी संवाद झाल्यानंतर रोहनने आपण कोणत्या उद्देशाने आलो आहेत हे सांगताच त्या ट्रॅव्हल कंपनीच्या प्रतिनिधीने एक प्रश्न विचारला,”तुमचे बजेट काय आहे अन तुम्ही एखादे स्थळ ठरवले आहे का? अन पुढच्या चर्चेतून आकारले ते एक परिपूर्ण Honeymoon Package. ह्या भल्या माणसाने सुचवलेला पर्याय, समाविष्ट सुविधा, दिलेल्या सूचना हे सर्व जर जैसे के तैसे घडले तर हा एक अदभुत अनुभव असेल असे मनोमन ठरवून रोहन व स्वाती आपल्या मधुचंद्राहून परत आल्यावर सर्वात प्रथम कुठे गेले असतील तर ह्या ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफिसमध्ये. आपल्या हातातील स्कॉचची बाटली अन फेरेरो रोशेर चॉकलेटचा डब्बा ह्या प्रतिनिधी समोर ठेवून आपले आभार प्रदर्शित करत असताना त्या प्रतिनिधीने त्यांना आपल्या संवादाची आठवण करून देत असताना आपण उच्चारलेले एक वाक्य आठवण करून दिले,” आम्ही पॅकेज नाही विकत, आम्ही अनुभव सजवतो.”

स्थळ :  जगाचा ७१% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. जगातील सर्वाधिक देशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके देश समुद्रापासून दूर वसलेले आहेत, त्यामुळे आपण निवडलेले वा इच्छिलेले स्थळ हे समुद्रकिनारी वसलेले आहे का? ह्या स्थळाच्या आसपास शहरी पट्टा आहे? आसपास फेरफटका मारण्याजोग्या जागा आहेत? विमानतळ, जलद वाहनांची सोय, तिथल्या स्थानिक लोकांच्या खाद्यसवयी, आपल्याला उपलब्ध करून दिलेले किंवा उपलब्ध असलेले जेवणाचे पर्याय, हे सर्व मुद्दे हिशोबात घेतले पाहिजेत.

कालावधी : Honeymoon म्हणजे स्थळदर्शनापेक्षा एकमेकांच्या सानिध्यात, एकांतात व्यतीत केलेले सुवर्ण क्षण. आपण ठरवलेले ठिकाण हे समुद्रकिनारा, शहरी भाग असा असेल अन कमीत कमी आपण दोन वेगवेगळ्या शहरांना भेटी देणार असू तर कमीतकमी सहा ते सात रात्र इतका कालावधी व तो देखील कमीतकमी खंडात विभागलेला असावा. उदाहरणार्थ थायलंडला जाणाऱ्या जोडयांनी आपले सात रात्रीचे वास्तव्य, तीन रात्री फुकेत, 2 रात्री क्राबी, 2 रात्री बँकॉक अशा खंडात विभागून घ्याव्यात. किंबहुना फुकेतला वास्तव्य करणाऱ्या जोडयांनी क्राबी वास्तव्य टाळने जास्त किफायतशीर.  एकाच प्रकारचे निसर्गवैभव, देखावे असलेल्या  दोन वेगळ्या स्थळांना भेट देण्यापेक्षा एखादे वेगळे स्थळ पाहणे किंवा तिथला खर्च आपल्या वास्तव्याचा दर्जा उंचावण्यात कामी लावणे जास्त फायदेशीर. त्यामुळे आपल्या मधुचंद्राचा कालावधी ठरवताना जग धावते म्हणून आपण धावू या असे करण्यापेक्षा ट्रॅव्हल प्रतिनिधीचा सल्ला अन मार्गदर्शन घेतलेले आपल्याला किफायतशीर पडू शकते.

राहण्याचा दर्जा : मधुचंद्राला जाताना पर्यटन हे जर एकच उद्दिष्ट असेल तर लॉज, द्वितारांकित असे पर्याय  आपल्या वास्तव्यास  निवडण्यास काहीही हरकत नाही पण महेंगा रोये एकबार, सस्ता रोये बारबार ह्या उक्तीनुसार जर शेवटच्या वेळेला होणारी हेळसांड टाळायची असेल तर कमीतकमी तीन तारांकित दर्जाची हॉटेल आपल्या वास्तव्यास निवडावीत. त्याहून उच्च दर्जाचे पर्याय निवडल्यास सोने पे सुहागा, परंतु तीन तारांकित हॉटेलमध्ये असलेल्या सुविधा ह्या खूप चांगल्या अन किफायतशीर असतात.

कार्यक्रम वा पर्यटन : मधुचंद्र म्हणजे प्रवास दौरा नसून तो एक मन जुळून नातं सजवण्याचा, ह्या नात्याच्या केक वर प्रेमळ सायीची मनमोहक अन आयुष्याला सजावणारी सुबक नक्षीकाम करण्याचा कालावधी. आपल्या पाच सहा दिवसाच्या मधुचंद्राच्या काळात जर सकाळ संध्याकाळ पर्यटन, जेवण, प्रवास ह्यात वेळ खर्ची घातला तर परदेशात किंवा मनाजोग्या प्रदेशात जाण्यापेक्षा मुंबईदर्शन केलेले जास्त योग्य. तुमच्या package designer ने जर  सहा दिवसांच्या वास्तव्यात तुम्हाला चार पूर्ण दिवस वेगवेगळया स्थळांच्या भेटींचा कार्यक्रम आखून दिला असेल तर तो मधुचंद्र नसून परिभ्रमणाचा कार्यक्रम समजावा. सहा दिवसांपैकी पहिला दिवस प्रवासाचा शिणवटा घालविण्यासाठी अन स्थिरावण्यासाठी, दुसरा दिवस आजूबाजूला फेरफटका अन संध्याकाळी अर्धा दिवस एखाद्या स्थळाला छोटीशी भेट. तिसरा दिवस पूर्ण दिवस पर्यटन. चौथ्या दिवशी स्थानिक बाजारातून थोडीशी खरेदी अन संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने हातात हात गुंफून किनाऱ्यावर लाटा तुडवत केलेली पायपीट, रात्री स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत एका ग्लासात दोन स्ट्रॉ टाकून प्यालेले एखादे मॉकटेल. पाचव्या दिवशी एखाद्या थीम पार्क किंवा ऍडव्हेंचर पार्कचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम. सहावा दिवस उशीरा उठून निवांत जेवणानंतर swimming pool मध्ये घेतलेली डुबकी किंवा संध्याकाळी swimming pool मध्ये पाय बुडवून केलेल्या मनमोकळ्या गप्पा. असा कार्यक्रम आखल्यास हा काळ कधी संपू नये अन घड्याळाचे काटे एका जागेवर स्थिरावेत असे न वाटले तर नवलच. नीटनेटका अन सुटसुटीत कार्यक्रम हा सुखद मधुचंद्राचा हमखास अनुभव.

विमानप्रवास : थोडेसे पैसे वाचविण्याचा मोह दाखवून तुमचा ट्रॅव्हल प्रतिनिधी जर तुम्हाला via विमानप्रवास, किंवा नियोजित स्थळी पोहोचण्याची अयोग्य वेळ आखून देत असेल तर थोडे जादा पैशे खर्च करून विमानप्रवासाचा योग्य पर्याय निवडणे कधीही शहाणपणाचे. उदाहरणार्थ सर्व जगात hotel चेक इन वेळ ही दुपार दोन नंतरची असते अशा वेळेला तुमचे विमान संध्याकाळी तीन किंवा चार वाजता पोहोचत असेल तर इमिग्रेशन, बॅगेज ह्या बाबी आटपून हॉटेलला पोहोचे पर्यंत संध्याकाळचे किमान पाच  वाजले असतील, तदनंतर स्थिरस्थावर होईस्तव सात वाजले. म्हणजेच  विमान प्रवासामधून दोन हजार वाचविण्याच्या नादात आपण आपला एक दिवस वाया घालवतो अन त्या दिवसासोबत हॉटेल वर खर्च केलेली रक्कम वाया गेली तो तोटा वेगळाच.

आता वर नमूद केलेले सर्व वाचले तर ही डोकेदुखी नको रे बाबा असेच कोणीही म्हणेल,पण योग्य मार्गदर्शन अन चांगले नियोजन केले तर एक अविस्मरणीय मंधुचंद्र आपण सुद्धा अनुभवू शकतो. सध्याच्या टेकनोलॉजीच्या जमान्यात अन बोटांच्या अग्रावर गूगल वसलेले असतानाIल तरुण मंडळी ऑनलाइन हा पर्याय सहज निवडतात, पण दोन पैसे वाचविण्याच्या नादात “दिसते तसं नसते” असा अनुभव पदरात पाडून घेतात. अन आयुष्यभर पैसा, अन बहुमोल वेळ वाया घालवला ह्याची खंत बाळगतात. गुजराती भाषेत एक सुंदर म्हण आहे, “जेनो काम तेनो थाय,, बीजा करे तो गोता खाय.”

म्हणून योग्य नियोजन सोबत अनुभवी सल्ला अन अचूक मार्गदर्शन हे एका सुंदर मधुचंद्रासाठी फार मोलाचे आहे.

मधुचंद्रासाठी काही उत्कृष्ट स्थळे

आशिया खंड -: थायलंड ( बँकॉक / पटाया / क्राबी / फुकेत ), सिंगापूरसह बिनतान बेट, मलेशियासह लंकावी बेट, इंडोनेशिया बाली, श्रीलंका.

आफ्रिका खंड -: मॉरिशस, सेशेल्स, मोरोक्को.

युरोप खंड-: ग्रीस, स्पेन, तुर्कस्थान, इटली, स्वित्झरलँड.

 

[DISPLAY_ULTIMATE_SOCIAL_ICONS]